Khed Crime | दोन वर्षांपूर्वीच्या वादाचा बदला; पत्नीसमोर पतीला तीन गोळ्या घालून ठार
बायकोला व्हॉट्सअपद्वारे छेडण्याच्या वादातून पेटलेल्या संघर्षाचा शेवट गुरुवारी झाला
महावार्ता लाईव्ह | दोन वर्षांपूर्वी मित्राच्या बायकोला व्हॉट्सअपद्वारे छेडण्याच्या वादातून पेटलेल्या संघर्षाचा शेवट गुरुवारी झाला. तरुणाने आपल्या मित्रावरच पत्नी समोर पाईट–शिरोली रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार (दि. 27) रोजी घडली. घटनेनंतर दुचाकीवरून आलेले तीन हल्लेखोर पसार झाले.
केतन शामराव कारले (वय 23, रा. चांदूस) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शुभम संतोष तांबे (वय 23, रा. आसखेड) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केतन याची पत्नी कुमकुम केतन कारले (वय 21) यांनी फिर्याद दिली.
केतन शामराव कारले हा पत्नी कुमकुमसोबत राजगुरुनगर न्यायालयात हजर राहण्यासाठी निघाला होता. दोघे दुचाकीवरून लादवड हद्दीत आले असता पाठीमागून तिघेजण ट्रिपलसीट दुचाकीवर येत आरोपींनी केतनवर सलग तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी डोक्यात, एक पाठीत आणि एक पायात लागून केतनचा जागीच मृत्यू झाला. पत्नी कुमकुम हिच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शुभम संतोष तांबे (23, रा. आसखेड) याच्यावर मुख्य संशय आहे. त्यासोबत दोन साथीदारही असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्नेहल गुरव - राजे करीत आहे.
