Hutatma Shivam Hari Rajguru | हुतात्मा राजगुरू जन्मस्थळी मंत्री आशिष शेलार यांना ‘शहीद दिन’ राज्यव्यापी साजरा करण्याची व स्मारक बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शासकीय अभिवादनाची मागणी ; स्मारक बांधकामाला वेग द्या; फक्त २० टक्के काम पूर्ण पंजाबप्रमाणे ‘गार्ड ऑफ ऑनर’ सुरू व्हावी
महावार्ता लाईव्ह | हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी राजगुरुनगर येथे आज महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना समस्त राजगुरुनगरकरांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. खेड तालुक्यातील राजगुरुनगरकर नागरिकांनी दिलेल्या या निवेदनात दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. २३ मार्च हा ‘शहीद दिन’ राज्यभर साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी दरवर्षी राजगुरुनगर येथे अभिवादनासाठी उपस्थित राहावे. तसेच हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ स्मारकाचे बांधकाम संपूर्ण आराखड्यानुसार वेगाने पूर्ण व्हावे.
https://mahavartalive.com/hutatma-shivram-hari-rajguru-23-march-martyrs-day-the-blazing-history-of-martyr-shivram-hari-rajguru
यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश आंधळे, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे सचिव अमर टाटिया, मधुकर गिलबिले गुरुजी उपस्थित होते. हे निवेदन ‘आम्ही राजगुरुनगरकर’ या नावाने सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले की, २३ मार्च १९३१ रोजी लाहोर कारागृहात हुतात्मा राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारने फाशी दिली होती. या तिन्ही क्रांतिकारकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ४ सप्टेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने ‘शहीद दिन’ म्हणून २३ मार्च साजरा करण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र त्याची अंमलबजावणी आजतागायत होत नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले.
पंजाब राज्यात २३ मार्च रोजी फिरोजपूर येथील समाधीस्थळावर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित राहून अभिवादन करतात, तसेच ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात येते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही दरवर्षी २३ मार्च रोजी राजगुरुनगर येथे मुख्यमंत्री व मंत्र्यांनी उपस्थित राहून शासकीय मानवंदना द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या सोबतच स्मारक बांधकामाच्या मुद्द्यावर देखील नागरिकांनी जोरदार पाठपुरावा केला. महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०२३ मध्ये १०४ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला होता. सध्या स्मारकाचे बांधकाम सुरू असले तरी केवळ २० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित भू-संपादन, रहिवाशांना आर्थिक मोबदला व पुनर्वसनाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करून संपूर्ण आराखड्यानुसार काम वेगाने व्हावे, अशी विनंती करण्यात आली.
निवेदनात पुढे म्हटले आहे, “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या देहाचे बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या जन्मस्थळी शासकीय पातळीवर योग्य मानवंदना मिळणे हे खेड तालुक्यातील तमाम जनतेचे अपेक्षित आहे. पंजाबच्या धर्तीवर राजगुरू वाडा स्मारकावर प्रतिवर्षी ‘गार्ड ऑफ ऑनर’ सुरू व्हावी यासाठी सरकारकडे मंत्री आशिष शेलार यांनी पाठपुरावा करावा.” अशी मागणी यावेळी करण्यात आली.