Khed Crop Damage Survey | खेड तालुक्यात खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू; २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची कार्यवाही; शेतकऱ्यांनी पंचनामा प्रक्रियेत सहकार्य करण्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांचे आवाहन

Khed Crop Damage Survey | खेड तालुक्यात खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू; २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 

महावार्ता लाईव्ह | शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये खेड तालुक्याचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी दिली.

 

खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद घेण्यासाठी खेड तालुक्यातील सर्व क्षेत्रीय स्तरावरील प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्राम विकास अधिकारी (ग्रामसेवक) तसेच कृषी सहाय्यक यांचा समावेश आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

ई-पिक पाहणीची सुविधाही उपलब्ध

शेतकऱ्यांना DCS MH मोबाईल ॲपद्वारे ई-पिक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना स्वतः ई-पिक पाहणी करता येणार आहे. काही कारणास्तव शेतकऱ्यांना स्वतः ई-पिक पाहणी करता येत नसल्यास प्रत्येक गावासाठी आवश्यकतेनुसार ई-पिक पाहणी सहाय्यक सर्वेअरची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

खेड तालुक्यासाठी सुमारे २२० सर्वेअरची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातूनही ई-पिक पाहणी करून घेता येणार आहे. संबंधित गावातील ई-पिक पाहणी सहाय्यकाची माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

 

शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची अचूक ई-पिक पाहणी नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष झालेल्या पिकांच्या नुकसानीची नोंद अचूकपणे होण्यास मदत होणार असून, पंचनामे करताना प्रशासनाला त्याचा आधार मिळणार आहे.

 

चावडीवर पंचनाम्यांचे वाचन

खेड तालुक्यात करण्यात येणारे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रत्येक गावच्या चावडीवर वाचन करण्यात येणार आहेत. त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

पिकांच्या नुकसानीनुसार शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारे अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून घेण्याबरोबरच पंचनामा प्रक्रियेत प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी केले आहे.