Pait Society Election | पाईट सोसायटीच्या अध्यक्षपदी अनिल डांगले, उपाध्यक्षपदी दिगंबर जांभळे यांची बिनविरोध निवड

पाईट विकास सोसायटीच्या रिक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड; सभासद शेतकरी व ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त.

Pait Society Election | पाईट सोसायटीच्या अध्यक्षपदी अनिल डांगले, उपाध्यक्षपदी दिगंबर जांभळे यांची बिनविरोध निवड

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईट विविध कार्यकारी सेवा सहकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी अनिल उर्फ मच्छिंद्र मुरलीधर डांगले, तर व्हाइस चेअरमनपदी दिगंबर उर्फ दत्तात्रय विलास जांभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाईट विकास सोसायटीवर माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व आहे. दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध झाल्याने सभासद शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

 

तालुक्याच्या पश्चिम भागात पाईट विकास सोसायटी अग्रगण्य आहे. मुदत संपताच आपापसात ठरल्याप्रमाणे दिलीप खेंगले यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला. रिक्त चेअरमन व व्हाइस चेअरमन पदांसाठी राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक पार पडली.

 

 

चेअरमन पदासाठी अनिल उर्फ मच्छिंद्र डांगले, तर व्हाइस चेअरमन पदासाठी दिगंबर उर्फ दत्तात्रय जांभळे यांचेच अर्ज निर्धारित वेळेत प्राप्त झाले. अन्य कोणाचेही अर्ज न आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी टी. सी. संकपाळ यांनी सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात जाहीर केली. बिनविरोध निवडीनंतर उपस्थितांनी जल्लोष केला.

 

तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष हिरामण रौंधळ आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

 

निवडणुकीप्रसंगी सभागृहात माजी चेअरमन पंडित रौंधळ, दिलीप खेंगले, रामदास सावंत, विजय करंडे, अनिल डांगले, साहेबराव चोरघे, ताराबाई बच्चे, नंदकुमार डांगले, संजय खेंगले, योगेश रहाणे, महादू डांगले, बबन डांगले, सुभाष डांगले, बबन खेंगले, सुनील डांगले, सोमनाथ डांगले, शंकर खेंगले, कैलास सोनवणे, तुकाराम बच्चे, ज्ञानेश्वर राळे, तान्हाजी करंडे, अतुल डांगले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार : अनिल डांगले

नवनिर्वाचित चेअरमन अनिल डांगले यांनी महावार्ता लाईव्ह चॅनेलशी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “खेड तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करीत असून, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यावर भर देण्यात येईल. सभासद शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी मागणीनुसार कर्जपुरवठा केला जाईल. पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत केल्याने शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो.”