खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आणणार : आमदार दिलीप मोहिते पाटील.

संस्थेचे ४७ वर्षात एकही भरीव काम नसून तरुणांना पदव्या देऊन बेरोजगार तरुणांची संख्या वाढविली.

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आणणार : आमदार दिलीप मोहिते पाटील.

राजगुरुनगर : प्रतिनिधी
शैक्षणिक संस्थेसाठी भरघोस निधी देऊन सहकार्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठनेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादीचे मंत्री,खासदार व आमदार यांना खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने प्रकाशित केलेल्या संस्थेच्या वार्षिक अहवालात टाळल्याचा आरोप खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला.संस्थेच्या मंडळाचा सुरूअसलेला अनागोंदी कारभार जनतेसमोर आणणार असल्याचा इशाराही आमदार मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिला.
      खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टेपाटील व संचालक मंडळाविरोधात रविवारी (दि.३) आयोजित पत्रकार परिषदेत मोहिते बोलत होते.

विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार
      लोकांच्या पैशावर उभारलेल्या संस्थेचे गेल्या ४७ वर्षात कोणतेही भरीव कार्य नसून उलट मालकी हक्क असल्याचा आव आणून या माध्यमातून काहींचे प्रपंच सुरु आहेत.या वितोधात विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा मोहितेंनी दिला.
         संस्थेच्या संचालक मंडळात माजी आमदार स्व. साहेबराव सातकर यांचे नातेवाईक व समर्थकांचे वर्चस्व असल्याचा मुद्दा मोहिते पाटील यांनी अधोरेखित केला.
     खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व पाच वर्षापूर्वी पासून स्व साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालय चालवले जाते.आठ हजारावर विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.खेड तालुक्यात सर्वात जुना इतिहास असलेली अशी ही शिक्षण संस्था आहे.राजकीय वलय असलेले संचालक मंडळ येथे गेली चाळीस वर्षे अस्तित्वात आहे.त्यातही माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील,त्यानंतर काही काळ माजी आमदार राम कांडगे आणि गेली पंचवीस वर्ष देवेंद्र बुट्टे पाटील अध्यक्ष आहेत.
        आमदार मोहिते यांची संस्थापकांवर टिका नुकतीच ३० सप्टेंबरला सर्वसाधारण सभा होऊन त्यात पुन्हा देवेंद्र पाटील यांना अध्यक्षपदी निवडण्यात आले. दोन दिवसांनी संचालक मंडळ जाहीर झाले.या निवडीच्या सभेला आमदार मोहिते पाटील यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते,तरीही ते सभेला उपस्थित होते.सभेत माजी आमदार साहेबराव सातकर यांचे संस्थेसाठी मोलाचे मोठे योगदान असल्याने त्यांचे पुत्र हिरामण सातकर यांना अध्यक्षपदाची संधी द्यावी असा,आग्रह मोहिते पाटील यांनी धरला,मात्र उपस्थित केलेले त्यांचे मुद्दे विचारात घेतले नाही.याशिवाय संचालक मंडळ निवडताना संपर्क केला नाही.यावरून आमदार मोहिते यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली.
      पत्रकार परिषदेत मोहितेंनी अनेक आरोप करून देवेंद्र बुट्टेपाटील,उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांच्यावर निशाणा साधला.ते म्हणाले,संस्थेकडे कोट्यावधी रुपये शिल्लक असताना कनिष्ठ,वरिष्ठ महाविद्यालया पलीकडे कोणतेही वाढीव दालन अध्यक्षाला उभे करता आले नाही. नुसत्या पदवी अभ्यासक्रमातून यांनी तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार वाढवण्याचे काम केले.रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या नाही.गेल्या पाच वर्षात दुसरे महाविद्यालय सुरु झाले.किमान दोन किमी अंतर गरजेचे असताना एकाच आवारात दोन महाविद्यालय सुरु आहेत.पाईटला परवानगी असताना राजगुरुनगरला कॉलेज चालवले जाते.
         पाच वर्षे महाविद्यालयास प्राचार्य नाही
विनाअनुदानीत असलेल्या या संस्थेत विद्यार्थ्यांचे विना पावती पैसे घेतले जातात.ही इमारत अनधिकृत असून लगतच्या जागांवर अतिक्रमण केले आहे. शिक्षक भरती करताना मोठ्या रकमा घेतल्या जातात त्याची संचालक मंडळात वाटणी होते. मागील काळात कॉलेजसाठी साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला. त्याच्या चौकशी वरून काही संचालक राजीनामा देऊन घरी गेले. हा पैसा कुठे मुरला? अध्यक्ष व ठराविक संचालक दिवसभर कॉलेजमध्ये बसून असतात. त्यांच्या हस्तक्षेपामुळे व्यवस्थापनाला आपले काम करता येत नाही. गेली पाच वर्षे प्राचार्य नाही. असे विविध प्रश्न मोहिते यांनी उपस्थित केले.
       नव्याने सुरु केलेल्या महाविद्यालयाला साहेबराव बुट्टे पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. ते पहिल्या कॉलेजच्या नावातील बलिदान कर्त्या हुतात्मा राजगुरू यांच्या इतके मोठे आहेत का? ज्यांनी जमिनी दिल्या, पैसे दिले त्यांचा यांना का विसर पडला? असाही प्रश्न उपस्थित केला.

शरद पवारांचे नाव घेऊन आमदार होता येणार नाही
 

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे.प्रत्येक उत्सव, कार्यक्रमात उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.पवार यांच्या उपस्थितीने अध्यक्ष व संचालक हुरळून गेले आहेत.त्यांना डावलले तरी कोणी वाकडे करणार नाही.ते सांगतील तेव्हा येतात त्यामुळे कधी ना कधी आपण आमदार होऊ असा काहींचा भ्रम निर्माण झाला आहे.मात्र नुसते एवढ्याने आमदार होता येणार नाही,त्यासाठी स्वखर्चाने लोकांमध्ये यावे लागते,अशी खरमरीत टीका आमदार मोहिते यांनी केली.
---------------------------------------------