Corporation election | राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीत 'लिलाव' ते 'भेटवस्तूंचा उच्छाद मांडला गेला ': लोकशाहीची थट्टा की विकासाचा फंडा ?
▪️प्रचाराची धामधूम: भेटवस्तूंच्या नावाने मतदारांचे 'हृदय जिंकणे' ▪️"लाडक्या बहिणींच्या मतांसाठी 'उबदार' भेट"
Rajgurunagar Corporation election 2025
महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. एका प्रभागात बिनविरोध नगरसेवक पदासाठी चक्क कोट्यवधींचा 'लिलाव' झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता प्रचाराच्या रिंगणात उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देण्यासाठी अनोख्या शक्कला लढवल्या जात आहेत. स्वेटर, साडी आणि कुंकवाचा करंडा यासारख्या 'भेटवस्तूंच्या वाटपाने उच्छाद मांडला आहे. फुकट भेटवस्तू मिळत असल्याने 'विशेषतः महिला मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असला, तरी प्रशासनाची भूमिका मात्र बघ्याचीच दिसत आहे. राजगुरूनगर नगरपरिषद नगरसेवकपदाच्या एकूण २१ जागा असून तीन जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १८ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजपा,शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा व अपक्ष असे पाच उमेदवार रिंगणात उभे आहेत. भाजपा,शिवसेना (शिंदेगट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) यांच्या महायुतीतील अंतर्गत राजकीय हेवेदावे आणि आपले वर्चस्व सिद्ध व्हावे म्हणून कलह या चुरशीमुळे निवडणूक अधिक रंगतदार होत चालली आहे.
'एक कोटी द्या, नगरसेवक व्हा': या लिलावाने हादरला महाराष्ट्र ?
निवडणुकीपूर्वीच राजगुरूनगरमध्ये नगरसेवक पदासाठी बोली लावून घडलेल्या लिलावाच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. नगरपरिषदेच्या एका प्रभागामधील गावकऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी अनोखा मार्ग अवलंबला आणि याची चर्चा महाराष्ट्र भर गाजली. हा लिलाव ग्रामदैवत असलेल्या गावातील एका मंदिरात पार पडला. लिलावप्रसंगी नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेले उमेदवार आणि स्थानिक नागरिक मंदिरात मोठ्या संख्येने जमले होते. ज्याची बोली जास्त, त्यालाच इतर उमेदवारांनी पाठिंबा देऊन अर्ज मागे घेण्याचे ठरले, बोलीतून गोळा झालेल्या रकमेचा वापर गावाच्या विकासासाठी, मंदिर दुरुस्ती, सार्वजनिक इमारत बांधकामासाठी केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रचाराची धामधूम: भेटवस्तूंच्या नावाने मतदारांचे 'हृदय जिंकणे'
लिलावाच्या वादळानंतर आता राजगुरूनगर शहराच्या गल्ली बोळात प्रचाराचा धूमधडाका सुरु आहे. या प्रचारात काही उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनोख्या क्लृप्त्या अवलंबल्या जात आहेत.
सत्ताधारी एका प्रमुख पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या समर्थकांनी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर 'उबदार' भेट म्हणून स्वेटर वाटपाची मोहीम जोरात हाती घेतली आहे. शहरातील अनेक प्रभागातील महिलांना स्वेटर आणि कुंकवाचे करंडे वाटप करण्यात आले, तर दुसऱ्या ठिकाणी साडी वाटपाचा 'अनोखा फंडा' राबवला जात आहे.या भेटवस्तू प्रचाराच्या नावाखाली उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमार्फत पोहोचवल्या जात आहेत,ज्यामुळे मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
"लाडक्या बहिणींच्या मतांसाठी 'उबदार' भेट"
नगरपरिषद निवडणुकीत विशेषत: महिला मतदारांना लक्ष्य करून राबवल्या जाणाऱ्या या भेटवस्तू योजना यशस्वी ठरत असल्याचे दिसते. एका ४५ वर्षीय गृहिणीने सांगितले, "स्वेटर आणि साडी मिळाली, पण त्यामुळे उमेदवाराची चांगली छाप पडली, तरीही, विकासाच्या मुद्द्यांवरच आपण मत द्यायचे असे त्यांनी खडसावून सांगितले." स्थानिक कार्यकर्ते मात्र याला 'सांस्कृतिक प्रचार' म्हणून पुढे सरसावत आहेत. पुणे जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांमध्येही अशा यात्रा आणि भेटवस्तू वाटपाच्या पद्धती प्रचलित झाल्या आहेत,यामुळे महिला मतदारांचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रशासनाची बघ्याची भूमिका: अनभिज्ञ की उदासीन?
महिला मतदारांना भेटवस्तू वाटप या सर्व घडामोडींवर जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेची भूमिका मात्र संशयास्पद दिसत आहे. लिलाव घटनेवर मौन बाळगले असले तरी भेटवस्तू वाटपावरही कोणतीही कारवाई झालेली नाही. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, मतदारांना प्रलोभन देणाऱ्या कृत्यांना दंड ठोठावला जाऊ शकतो, पण स्थानिक अधिकाऱ्यांकडून "आम्हाला याची माहिती नाही" असे सांगितले जाते. राजकीय विश्लेषकांच्या मते, "प्रशासन अनभिज्ञ दाखवत असले तरी हे सर्व डोळ्यांसमोर घडत आहे. ही उदासीनता निवडणुकीच्या शुद्धतेला धक्का देईल." याबाबत प्रशासनाचे एका जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगितले की वस्तू वाटप बाबत आमच्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तपासणी केली आहे.

मतदारांमध्ये चर्चेचा विषय: विकास की पैसा?
राजगुरूनगरच्या चहा व पान टपऱ्यांवर घरोघरी स्वेटर व साडी वाटपाची चर्चा आहे.वस्तू वाटपाचा फॅक्टर किती यशस्वी होतो हे निकालाअंती स्पष्ट होईल.नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये भाजपचे शिवाजी मांदळे, शिंदे शिवसेनेचे मंगेश गुंडाळ, राष्ट्रवादीचे किरण आहेर आणि शिवसेना उबाठाचे बाप्पू थिगळे यांच्यात मोठी चुरस आहे.३ नगरसेवक बिनविरोध झाल्याने एकूण १८ नगरसेवकपदांसाठी प्रशासनाने मतदानाची तयारी सुरू आहे.
निवडणुकीच्या निकालाने राजगुरूनगरचा विकासाचा मार्ग निश्चित होईल,की हा 'लिलाव व भेट वस्तूंचा खेळ आणखी वाढेल? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. दरम्यान मतदारांनी जागरूक राहून विकासाच्या मुद्द्यांवरच मतदान करण्याचे आवाहन राजकीय नेत्यांकडून केले जात आहे.

