उसने दिलेले पैसे घरी मागण्यासाठी आल्याने तरुणावर कोयत्याने केले वार

कारमधून अपहरण करून आळंदी-मरकळ रोडवरील एका दारूच्या भट्टीवर नेले : आरोपी ने कोयत्याने वार करून इसमास गंभीर जखमी केले

उसने दिलेले पैसे घरी मागण्यासाठी आल्याने तरुणावर कोयत्याने केले वार

चाकण - न्यूज नेटवर्क 

एका व्यक्तीला उसने दिलेले पैसे मागण्यासाठी त्याच्या घरी गेलेल्या तरुणाला मारहाण केली. घरी आल्याच्या रागातून त्याच्यावर कोयत्याने वार करून अपहरण केले.तसेच पुन्हा कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 3) मध्यरात्री बारा वाजता हरगुडेवस्ती ते आळंदी मरकळ रोडवरील एका दारूच्या भट्टीवर घडली.

अभिराज जोखूराम कोरी (वय 28, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू पगारे, रतन उर्फ विकी काळे, कान्हा रजपूत, दयाराम उर्फ दया मारवाडी नाथाराम चौधरी (वय 39, रा. खराबवाडी चाकण), स्वप्नील (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोरी यांनी आरोपी कान्हा याला 10 हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे मागण्यासाठी कोरी हे कान्हा याच्या घरी गेले. त्याचा कान्हाला राग आला. त्याने कोरी यांना मारहाण करून ढकलून दिले. कोरी हे पैसे मागण्यासाठी घरी आल्याचा कान्हाच्या मनात राग होता. त्यातून त्याने त्याच्या साथीदारांना घेऊन एका कारमधून येऊन कोरी यांच्यावर कोयत्याने वार केले.

त्यानंतर कोरी यांचे कारमधून अपहरण करून त्यांना आळंदी-मरकळ रोडवरील एका दारूच्या भट्टीवर नेले. आरोपी राजू आणि रतन यांनी कोरी यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपी कान्हा याने कोरी यांना 'परत पैसे मागायला माझ्या घरी यायचे नाही' अशी धमकी दिली. त्यांनतर आरोपींनी कोरी यांना कारमध्ये घालून कुदळवाडी चिखली येथील एका हॉस्पिटलसमोर रस्त्यावर फेकून पळ काढला. पोलिसांनी आरोपी दयाराम याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख तपास करीत आहेत.

------------------------------------------------------------------