Rajgurunagar suicide | दोन मुली झाल्याच्या कारणावरून छळ; विवाहितेने चिमुरडीसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

“तुला मुलगा होत नाही” या कारणावरून पती वारंवार अपमानास्पद वागणूक ; विविहित महिलेची मुलीसह आत्महत्या

Rajgurunagar suicide | दोन मुली झाल्याच्या कारणावरून छळ; विवाहितेने चिमुरडीसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

 

महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर (ता. खेड) : पतीकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून ३५ वर्षीय विवाहितेने आपल्या चार वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संजीवनी लक्ष्मण कुमटकर (वय ३५) या आपल्या पती लक्ष्मण अश्रुबा कुमटकर यांच्यासोबत राजगुरूनगर येथे राहत होत्या. त्यांना दोन मुली आहेत. संजीवनी यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी जबाबानुसार, विवाहानंतर काही वर्षांतच पती लक्ष्मण कुमटकर यांनी संजीवनी यांना सतत मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. पहिल्या मुलीच्या जन्मानंतरच छळ वाढला होता.त्यानंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने काही वेळा समेट घडवून आणण्यात आला होता.

 

दरम्यान, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर परिस्थिती आणखी बिघडली. “तुला मुलगा होत नाही” या कारणावरून पती वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याचे सांगितले. तसेच घटस्फोट घेण्याचा दबाव टाकत दुसरे लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. २६ एप्रिल रोजी संजीवनी या पती व मुलीसह माहेरी आल्या होत्या. त्या वेळीही त्यांनी होत असलेल्या छळाबाबत घरच्यांना माहिती दिली होती. मात्र नातेवाईकांनी समजूत काढून त्यांना पुन्हा सासरी पाठवले.

 

३० एप्रिल रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण कुमटकर यांनी फोन करून संजीवनी यांनी लहान मुलगी अनुजासह सांडभोरवाडीतील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तत्काळ राजगुरूनगर गाठले.ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे दोघींचे  शवविच्छेदन करण्यात आले.

 

फिर्यादीनुसार, पतीकडून दीर्घकाळ चाललेल्या छळामुळेच संजीवनी यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पती लक्ष्मण कुमटकर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.