अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गटनेते विजयसिंह शिंदे यांची पुणे-नाशिक महामार्गाची पाहणी; मदत कार्याला वेग
भामा परिसरातील पूरस्थितीचा घेतला आढावा; प्रशासनाशी समन्वय साधत नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांसह सुरू केले मदतकार्य.
महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नाशिक महामार्गावरील भामा परिसरात निर्माण झालेल्या परिस्थितीची जिल्हा परिषद गटनेते तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, खेडचे सभापती ॲड. विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यावेळी महामार्गावरील पाणी साचलेले भाग, वाहतुकीची स्थिती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा आढावा घेत प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी स्थानिक सहकाऱ्यांसह मदत कार्याला सुरुवात करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्य प्रसाद घेणंद, खरेदी-विक्री संघाचे संचालक किरण लोखंडे पाटील, युवा सहकारी नितीन आवटे तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ॲड. शिंदे पाटील यांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे, नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनासोबत समन्वयाने मदत कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.