Kharpudi KT Dam Repair | दशक्रिया आंदोलनाचा धसका; खरपुडी बंधाऱ्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार
चेअरमन सोमनाथ टोपे, राजेंद्र मांजरे, सचिन गाडे व सहकाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची प्रशासनाकडून दखल; अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत दिला काम सुरू करण्याचा शब्द
महावार्ता लाईव्ह | खरपुडी येथील केटी बंधाऱ्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक तरुण आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. मंगळवारी जलसंपदा विभागाला ‘दशक्रिया आंदोलन’ करण्याचा इशारा देण्यात आल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशीच प्रशासनाने खरपुडी बंधाऱ्यावर धाव घेत पाहणी केली. येत्या मंगळवारपासून बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
खरपुडी खुर्द आणि खरपुडी बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या केटी बंधाऱ्याची दुरवस्था झाली असून, त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यामुळे परिसरातील सहा गावांतील शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चेअरमन सोमनाथ टोपे, राजेंद्र मांजरे, सचिन गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी जलसंपदा विभागाची दशक्रिया करण्याचा इशारा दिला होता.
आंदोलनाची घोषणा होताच प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन तात्याबा जाधवर यांनी आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत बंधाऱ्याच्या प्रश्नावर चर्चा केली. तसेच चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५, खेड (राजगुरुनगर) येथील उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी रविवारी प्रत्यक्ष खरपुडी बंधाऱ्यावर उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत आवश्यक कार्यवाही करून मंगळवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असा शब्द अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते ॲड. विजयसिंह शिंदे पाटील यांनी मध्यस्थी करत प्रशासनाशी समन्वय साधला. तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे यांनीही प्रशासनाला आवश्यक निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.
पाहणीवेळी लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांची उपस्थिती
रविवारी झालेल्या पाहणीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, जिल्हा परिषद सदस्य गणेश आरगडे, ग्रामस्थ, शेतकरी आणि परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आश्वासन नको, प्रत्यक्ष काम सुरू करा!
आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर रविवारीच अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यावर येऊन पाहणी केल्याने तरुणांच्या एकजुटीचा आणि आंदोलनाच्या भूमिकेचा प्रशासनावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, केवळ आश्वासन देऊन प्रश्न सुटणार नाही, तर प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्ते आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे.
आता प्रशासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे मंगळवारपासून खरपुडी केटी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू होते का, याकडे खरपुडीसह परिसरातील सहा गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या आश्वासनाची अंमलबजावणी होते की पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.