Khed crime | राजगुरूनगर मार्केटयार्ड परिसरात तरुणाला मारहाण; १,२०० रुपये जबरीने काढून घेतल्याचा आरोप, सात जणांविरुद्ध गुन्हा

राजगुरूनगरात मारहाण आणि लूटप्रकरण; ५ आरोपी अटक ; पोलिसांकडून तपास सुरू

Khed crime | राजगुरूनगर मार्केटयार्ड परिसरात तरुणाला मारहाण; १,२०० रुपये जबरीने काढून घेतल्याचा आरोप, सात जणांविरुद्ध गुन्हा

 

महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर येथील मार्केटयार्ड परिसरात जुन्या वादातून एका तरुणाला व त्याच्या चुलत्याला मारहाण करून खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम विजय सावंत (वय २३, रा. ढमढेरेवस्ती, चास, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुक्रवार (दि. ५ जून २०२६) रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास राजगुरूनगर येथील मार्केटयार्डच्या कमानीजवळ ही घटना घडली.

 

फिर्यादीनुसार, शुभम सावंत हे आरोपी अक्षय साळुंके याच्याशी आपसातील वादाबाबत बोलत असताना अक्षय साळुंके याने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अक्षय साळुंके व त्याचे साथीदार रोहित मुळेकर, श्रीनाथ वायकर, अमोल मकवाणे, किरण भंडारी, (रा. पाबळ ता. शिरूर ) आदित्य घनवट आणि अमजद मुलाणी (रा. चास ता. खेड ) यांनी एकत्र येत गर्दी जमवली.

 

आरोपींनी शुभम सावंत तसेच त्यांचे चुलते दत्तू गुलाब सावंत यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच काही आरोपींनी शुभम सावंत यांचे दोन्ही हात धरून ठेवले असताना अक्षय साळुंके याने त्यांच्या शर्ट व पँटचे खिसे तपासून पँटच्या मागील खिशात असलेले १ हजार २०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.