Khed crime | कोहीनकरवाडी मुळेवस्ती येथे वीज रोहित्र फोडून कॉपर वायरची चोरी; महावितरणचे ५० हजारांचे नुकसान
रोहित्र खाली पाडून कॉपर वायंडिंग लंपास, महावितरणचे ५० हजार रुपयांचे नुकसान ; २०० लिटर ऑईल सांडल्याने अतिरिक्त हानी
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील कोहीनकरवाडी मुळेवस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या वीज रोहित्राला लक्ष्य करत त्यातील कॉपर वायर चोरी करून मोठे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) राजगुरूनगर विभागात लाईनमन म्हणून कार्यरत असलेले महेंद्र शिवाजी विधाठे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, दिनांक ९ जून २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोहीनकरवाडी मुळेवस्ती येथील वायरमन कैलास वरकड यांनी विधाठे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली की, गावातील नवीन २२/१०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र खाली पाडण्यात आले असून त्यातील ऑईल सांडलेले आहे. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रोहित्राचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
तपासणीत रोहित्रातील तीन कॉपर वायंडिंग चोरीला गेल्याचे आढळून आले. तसेच रोहित्रातील सुमारे २०० लिटर ऑईल जमिनीवर सांडल्याने अतिरिक्त नुकसान झाले आहे. महावितरणच्या प्राथमिक अंदाजानुसार चोरीस गेलेल्या कॉपर वायंडिंगची किंमत सुमारे ४० हजार रुपये असून ऑईलचे नुकसान सुमारे १० हजार रुपये आहे. त्यामुळे एकूण ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ८ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजता संबंधित रोहित्र व्यवस्थित स्थितीत असल्याची खात्री करण्यात आली होती. मात्र रात्री ९.३० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी रोहित्र खाली पाडून त्यातील कॉपर वायर चोरट्यांनी काढून नेले.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.
