Rajgurunagar Traders Federation welcomes | तुकाराम मुंडे यांच्या धाडसत्राचे राजगुरुनगर व्यापारी महासंघाकडून स्वागत ; व्यपारी संघाची बैठक संपन्न
अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन; पार्किंग, ट्रान्सपोर्ट भाडेवाढीसह विविध विषयांवर सखोल चर्चा
महावार्ता लाईव्ह | महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी रुजू होताच आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर सुरू केलेल्या धाडसत्र मोहिमेचे राजगुरुनगर शहर व्यापारी महासंघाने स्वागत केले आहे. याच पार्श्वभूमीवर महासंघाची तातडीची आणि महत्त्वपूर्ण बैठक शहरातील आनंदी आनंद मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली.
आरोग्य सुरक्षेसाठी प्रशासनाच्या मोहिमेला पाठिंबा
या बैठकीस शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते, बेकरी व्यावसायिक, दूध डेअरी चालक, हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, स्वीटमार्ट चालक तसेच विविध क्षेत्रातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे कार्यक्षम आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या मोहिमेचे स्वागत करत व्यापारी महासंघाने अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.
भेसळमुक्त व स्वच्छ व्यवसायावर भर
बैठकीत व्यावसायिकांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, कोणत्याही प्रकारचे भेसळयुक्त पदार्थ वापरू नयेत, स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. फूड लायसन्स, कामगारांची आरोग्य तपासणी, अन्न सुरक्षा मानके आणि अन्य कायदेशीर बाबींमध्ये व्यापारी महासंघ आवश्यक ते सहकार्य करेल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
व्यापाऱ्यांच्या पाठीशी महासंघ, मात्र नियमभंग खपवून घेणार नाही
यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांच्या अडीअडचणीच्या काळात महासंघ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. मात्र कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही. सर्व व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करूनच व्यवसाय करावा, अशा कडक सूचना देखील देण्यात आल्या.
पार्किंग आणि ट्रान्सपोर्ट प्रश्नांवरही चर्चा
बैठकीत शहरातील वाढती वाहन पार्किंग समस्या, ट्रान्सपोर्ट भाडेवाढ आणि व्यापाराशी संबंधित विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढील दोन दिवसांत खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ट्रान्सपोर्ट भाडेवाढीच्या प्रश्नावर संबंधित घटकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचेही ठरले.
व्यापारी नियमावलीबाबत सविस्तर मार्गदर्शन
बैठकीचे सूत्रसंचालन अलंकार फुटवेअरचे मालक माणिक होरे यांनी केले, तर प्रास्ताविक स्वानंद खेडकर यांनी केले. विनय लोढा आणि सचिन कुलकर्णी यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या नियमावलीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. चंदन खारीवाल यांनी आभार प्रदर्शन केले.
बैठकीस मान्यवरांची उपस्थिती
बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी शाम चौधरी, अमर टाटिया, प्रविण शेटे, सूरज वाडेकर, राहुल वाळुंज, दिलीप तापकीर, श्रवणराम पटेल, जितेंद्र चव्हाण, सतिश थिगळे, पवन गदिया, विशाल कहाणे यांच्यासह अनेक प्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी राजगुरुनगर नगर परिषदेचे नगरसेवक व उद्योजक दिनेश सांडभोर पाटील, नगरसेवक फैजभाई मोमीन, माजी सरपंच प्रदीप कासवा, उद्योजक बाळासाहेब सांडभोर, कुशल ओसवाल तसेच शहरातील अनेक ज्येष्ठ व्यापारी उपस्थित होते.
नियमांचे पालन करा, ग्राहकांचा विश्वास जपा
राजगुरुनगर व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि कायदेशीर नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड न करण्याचा निर्धार व्यक्त केला. महासंघाने तुकाराम मुंडे यांच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवत जबाबदार व्यापार संस्कृती रुजविण्याचा संदेश दिला.