Kalmodi Dam overflow | कळमोडी धरण १०० टक्के भरले; सांडव्यावरून अनियंत्रित विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आरळा (भीमा) नदीपात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

Kalmodi Dam overflow | कळमोडी धरण १०० टक्के भरले; सांडव्यावरून अनियंत्रित विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील कळमोडी धरण १०० टक्के भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून आरळा (भीमा) नदीपात्रात अनियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर चासकमान पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

चासकमान पाटबंधारे विभागाने सोमवार (दि. ६ जुलै) रात्री ११.४५ वाजता प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. हे धरण द्वाररहित (Ungated) असल्यामुळे सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग नैसर्गिकरीत्या सुरू झाला असून तो नियंत्रित करता येत नाही.

 

यामुळे आरळा (भीमा) नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात किंवा नदीलगत जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात जनावरे, शेतीची अवजारे, पंप, साहित्य किंवा इतर वस्तू असल्यास त्या तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

याशिवाय संबंधित ग्रामपंचायतींनी गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. ही सूचना चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता इंजि. मो. ता. जाधवर यांनी जारी केली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.