मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पंचायत समितीची इमारत नियोजित जागेतच बांधली जाईल - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे
राजगुरूनगर : प्रतिनिधी
स्व.सुरेश गोरे यांच्या काळात मंजूर झालेली खेड पंचायत समितीची इमारत नियोजित जागेत बांधण्यासाठी हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेशी चर्चा करून इमारत त्याच ठिकाणी बांधली जाईल.चाकण नगरपरिषद नवीन इमारतीसाठी ५ कोटींचा निधी तर चाकण पाणी पुरवठा योजनेला ७० लाखाचा निधी देऊ,अत्याधुनिक अँबुलन्स देखील देऊ,असे सांगून सुरेशभाऊ गोरे यांचे स्मरणार्थ त्यांचे गावात भव्य सांस्कृतिक वास्तू उभारण्यासाठी पाहिजे तेवढा निधी दिला जाईल असे ठोस आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण येथे दिले.
चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात रविवारी (दि.१०) माजी आमदार स्व.सुरेशभाऊ गोरे यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महाआरोग्य शिबिर,कोरोना योद्धा पुरस्कार व हभप रामराव महाराज ढोक यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला.स्व.सुरेश गोरे यांना श्रद्धांजली वाहताना आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांचेहस्ते अनेक मान्यवरांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान केला.
यावेळी माजी कामगार मंत्री सचिन अहिर,शिवसेनेचे समन्वयक रवींद्र मिर्लेकर, शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील,माजी आमदार शरद सोनवणे,माजी महापौर राहुल जाधव,स्व.सुरेश गोरे कुटुंबातील राहुल गोरे,नितीन गोरे,निलेश गोरे,दत्तात्रय गोरे,उमेश गोरे आणि सेनेसह अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री महोदय शिंदे पुढे म्हणाले,सुरेश भाऊंनी वैयक्तिक काम मला कधीच सांगितले नाही.तालुक्याचे विकासाचे काम माझ्याकडे घेऊन यायचे.मितभाषी, सुसंस्कृत,संयमी असा त्यांचा स्वभाव होता.मतदारसंघात त्यांनी मोठे काम उभे केले.जिथे संधी मिळाली तिथे त्यांनी कामाचा ठसा उमटविला.दांडगा जनसंपर्क ठेवल्याने त्यांनी माणसे जोडली आणि सांभाळली.२०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असताना त्यांनी कामासाठी पक्षाकडे संपर्क ठेवला होता.आमदार असताना पाच वर्षे त्यांनी विधिमंडळात अनेक प्रश्न सभागृहात मांडले आणि त्याची दखल सभागृहाने घेतली.
ते पुढे म्हणाले आजारातून भाऊ बाहेर येऊ शकले नाही हे मोठे दुर्दैव आहे.केलेल्या कामामुळे माणसाच्या आठवणी चिरंतन राहतात,तशाच आठवणी सुरेश भाऊंच्या राहतील.शिवसेना पक्ष गोरे कुटुंबाच्या मागे ठामपणे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात अनेकांची भाषणे झाली.सूत्रसंचालन निवेदक सुदाम कराळे व सूर्यकांत मुंगसे यांनी केले.

