BJP Teachers' Front demands of Khed Tehsildar | जनगणना कामावरील प्रगणक व पर्यवेक्षकांना ‘विमा संरक्षण’ द्या; भाजप शिक्षक आघाडीची खेड तहसीलदारांकडे मागणी

अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे जनगणना कर्मचाऱ्यांमध्ये भीती; शासनाकडे तातडीच्या विमा संरक्षणाची मागणी

BJP Teachers' Front demands of Khed Tehsildar | जनगणना कामावरील प्रगणक व पर्यवेक्षकांना ‘विमा संरक्षण’ द्या; भाजप शिक्षक आघाडीची खेड तहसीलदारांकडे मागणी

 

महावार्ता लाईव्ह | जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर जनगणनेच्या कामावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक कर्मचारी, प्रगणक व पर्यवेक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या कर्मचाऱ्यांना शासनाने तात्काळ अपघाती व जीवितहानी विमा संरक्षण लागू करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या वतीने खेडचे तहसीलदार तथा जनगणना प्रभारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

भाजपचे राजगुरूनगर मंडलाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू पानमंद यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन तहसील कार्यालयात सादर करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या जनगणना मोहिमेत कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

अपघातांच्या घटनांमुळे वाढली चिंता

खेड तालुक्यात जनगणना अधिनियम, १९४८ मधील कलम ५ व ११ अन्वये अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी सध्या घराघरांत जाऊन माहिती संकलनासह विविध जनगणना पूर्वतयारीच्या कामात सहभागी आहेत.

मात्र, अलीकडील काळात राज्यातील विविध भागांमध्ये जनगणनेच्या कामादरम्यान काही शिक्षक कर्मचारी अपघातग्रस्त झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काहींना गंभीर दुखापती झाल्या असून, काही ठिकाणी जीवितहानीच्या घटनाही घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जनगणना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

निवेदनातील प्रमुख मागण्या

जनगणनेच्या कामावर नियुक्त प्रत्येक प्रगणक व पर्यवेक्षकासाठी शासनस्तरावरून विशेष अपघाती विमा योजना लागू करावी. कर्तव्य बजावताना अपघात झाल्यास सर्व वैद्यकीय खर्च शासनाने उचलावा. गंभीर दुखापत किंवा अपंगत्व आल्यास संबंधित कर्मचाऱ्याला विशेष आर्थिक मदत द्यावी.

कर्तव्यावर असताना दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी.जनगणना कालावधीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत.

 

शिक्षकांच्या सुरक्षेसाठी शासनाने पुढाकार घ्यावा

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जनगणनेचे काम करणारे शिक्षक व कर्मचारी हे शासनाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने विमा संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा योजना लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

 

अनेक पदाधिकारी उपस्थित

निवेदन सादर करताना भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निलेश घुमटकर, कुमार सांडभोर, राजेंद्र जाधव, फैज मोमीन, मंडळ सरचिटणीस निखिल सांडभोर, भाजप विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष रवी वाडेकर, पदवीधर आघाडीचे प्रतिनिधी तसेच शिक्षक आघाडीचे पदाधिकारी आणि तालुक्यातील शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

 

"राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जीविताचे संरक्षण करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे जनगणना कर्मचाऱ्यांसाठी तातडीने विमा संरक्षण लागू करावे," - माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे