Rajgurungar | चांडोलीच्या महावितरण कार्यालयात शिरलेला बिबट्या जेरबंद
बंदुकीतून भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला पकडले | महावितरण कार्यालय बाहेर बघ्यांची गर्दी
राजगुरूनगर : सकाळी दिवसाढवळ्या राजगुरूनगर जवळच्या चांडोली येथील महावितरण कार्यालयात शिरलेल्या मादी जातीच्या बिबट्याला मोठ्या शिताफने पकडण्यात आले.पाचसहा दिवसापासून सदर बिबट मादीने चांडोली गावात धुमाकूळ घातला होता.अखेर बिबट निवारा केंद्र माणिकडोह येथील रेस्क्यू टिमच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्याची यशस्वी कामगिरी केली.बिबट्याला पकडल्याने चांडोली सह परिसरातील गावच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
पाचसहा दिवसापूर्वी चांडोली येथील सम्राट रेसिडेन्सी मध्ये नागरिकांना दिसलेला बिबट्या पळून गेला होता. तेंव्हापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी नागरिकांकडून होती.राजगुरूनगर वनविभाग परिसरात बिबट्याचा शोध घेत होते.
बुधवारी (दि.१०) चांडोली येथील महावितरण विभागातील मीटर टेस्टिंग कार्यालयाचा दरवाजा उघडून वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके बाहेर येत नाही तोच बिबट्या आत शिरला आणि कोपऱ्यात जाऊन बसला.शेळके या महिला कर्मचाऱ्यांवर काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि त्या बिबट्याच्या तावडीतून बचावल्या.परंतु त्यांनी वेळप्रसंग ओळखून कार्यालयाचा दरवाजाची कडी लावून बिबट्याला आत कोंडले.
बिबट्या महावितरण कार्यालयात शिरल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.सदर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला पाचारण केले.त्यांनी लगेच माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राला माहिती देताच रेस्क्यू टीम काही तासात हजर झाली.
बिबट निवारा केंद्राचे डॉ. महेंद्र ढोरे,अविनाश विचलकर,वैभव नेहरकर,आकाश डोळस आणि त्यांच्या रेस्क्यू टीमने सदर बिबट मादीला भुलीचे इंजेक्शन देऊन तासाभरात पकडले.राजगुरूनगर वनपरीक्षेत्राचे अधिकारी प्रदीप रौधळ, वनपाल दत्ता फाफाळे, सागर तांबे, चेतन नलावडे, अंकुश बुट्टे, शिवाजी ढोले यांनीही बिबट्याला पकडण्यासाठी मदत केली.बिबट्याला पकडल्याचे समजताच गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
राजगुरूनगर जवळच्या चांडोली येथील ढूम्या डोंगरावर दररोज सकाळी व सायंकाळी शहरातील नागरिक सकाळी मॉर्निंग वॉक म्हणून डोंगरावर जातात.डोंगर व परिसरात घनदाट झाडी व ऊस क्षेत्र तसेच ओढ्याचा भाग असल्याने या ठिकाणी नागरिकांनी जीव धोक्यात घालून एकट्याने फिरू नये.सकाळी व सायंकाळी फिरायला जाताना नागरिकांनी समूहाने जाणे योग्य आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली करंडे - उद्योजक राजगुरूनगर
