पाईट पाझर तलावाला अजूनही मोठा धोका; बंधारा फुटण्याची भीती, प्रशासन सतर्क

जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी अधिकाऱ्यांसह केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी; मुसळधार पावसामुळे तातडीची दुरुस्ती अशक्य, पाईट–अहिरे–तोरणे रस्ता बंद करण्याच्या सूचना

पाईट पाझर तलावाला अजूनही मोठा धोका; बंधारा फुटण्याची भीती, प्रशासन सतर्क

 

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पाईट येथील पाझर तलाव अतिवृष्टीमुळे फुटला आहे.जीवितहानी झाली नाही परंतु पाझर तलावाखालील शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. फुटलेल्या पाझर तलावाची परिस्थिती अद्याप गंभीर असून, तलावाच्या मुख्य भागाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे तलावाच्या बंधाऱ्यावर पाण्याचा मोठा ताण निर्माण झाल्याने मुख्य भाग फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे तलावाच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देत आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बोरकर,तहसीलदार प्रशांत बेडसे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता उभे, तांदळे मॅडम, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, महावितरणचे शाखा अभियंता तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सर्व अधिकाऱ्यांनी पाझर  तलावाची बारकाईने पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला.


सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जड यंत्रसामग्री घटनास्थळी नेणे शक्य नाही.त्यामुळे बंधाऱ्याच्या मुख्य भागाची तातडीने दुरुस्ती करणे अशक्य असून,पाऊस कमी झाल्यानंतर दुरुस्तीची कामे हाती घेता येतील.तसेच सांडव्याचा भाग पक्क्या खडकामध्ये असल्याने त्याचे खोलीकरण करणेही सध्या शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे तलावावरील वाढता पाण्याचा ताण कायम असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पाईट–अहिरे–तोरणे मार्ग बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 


दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून,परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.