Khed | राजगुरुनगर - वाडा रस्त्याचे काम कासव गतीने
ऐन पावसाळ्यात रत्याचे व गटरचे काम सुरू | वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण | नागरिकांनी केला संताप व्यक्त ; रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी
राजगुरूनगर : शहरातील वाडारोड या मुख्य रस्त्यासह बंदिस्त ड्रेनेजचे काम संथ कासव गतीने सुरु असल्याने वाहतुकीचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे.रस्त्याचे क्रॉक्रीटकरणाचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल शहरातील नागरिक व व्यापारी वर्गाकडून उपस्थित होऊ लागला आहे.
राजगुरूनगर शहरातून पश्चिम भागासाठी गेलेला वाडारोड हा राज्य मार्ग असलेला प्रमुख रस्ता आहे.शहरातील महात्मा गांधी विद्यालय ते संगम कापड दुकान पर्यंत या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात सुरु केले.तर बंदिस्त ड्रेनेज लाईनचे काम हौद ओढ्यापर्यंत झालेले आहे.रस्त्याचे काम विद्यालयापासून ते संगम पर्यंत करताना ठेकेदाराने निम्मा रस्ता उत्तर बाजूने खोदला आहे.त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरु आहे.
रस्ता खोदला त्यामध्ये पावसाचे पाणी साचून अक्षरशः गाळाची रबडी झाली.यामधून प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.अर्ध्या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु असल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनामुळे वाहतूक चक्का जाम होत असल्याने कुणी गाडी पाठीमागे घ्यायची हा देखील प्रश्न निर्माण झाला असून दुचाकीस्वार यांचीही प्रचंड वर्दळ सुरु आहे.
रस्त्याचे काम सुरु असल्याने शहरातील नागरिकांना आता या रस्त्याने प्रवास नकोसा झाला आहे.शहरात जाण्यासाठी पोलीस स्टेशनचा पूल यासह राजगुरू वाडा व अमोल डेअरी येथून भीमा नदीवर झालेला पूल आहे.परंतु काही वेळेस नागरिक नकळत हौद ओढ्या वरील पुलाने येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.ठेकेदाराने या रस्त्याचे काम खरं तर उन्हाळ्यात करणे आवश्यक होते परंतु पावसाळ्यात काम सुरु केल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांची दमछाक होत आहे.
खेड बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी देखील रस्त्याच्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला लवकरच कामाच्या सूचना केलेल्या दिसत नाहीत हे कासव गतीने चाललेल्या कामावरून सिद्ध होत आहे.रस्त्याच्या कामासाठी मोठी यंत्रणा लावून ठेकेदाराने लवकर काम करावे अशी मागणी राजगुरूनगर शहरातील नागरिकांची आहे.
राजगुरूनगर शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.रस्त्याच्या कामामुळे वाडा रोड मार्गे चारचाकी वाहनांना शहरात येणे सध्या अवघड झालेले असल्यामुळे व्यापारावर परिणाम झाला आहे.ड्रेनेज लाईन करिता रस्ता खोदल्याने शहराच्या मुख्य वेशितून मोठी वाहने येऊ शकत नाही.
दत्तात्रय वडगावकर - राजलक्ष्मी ज्वेलर्स
पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम ठेकेदाराने केले पाहिजे होते. परंतु पावसाळ्यात काम सुरु केल्याने वाहतुकीचा फज्जा उडाला आहे.वाडा रोड मार्गांवरून जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल सुरु आहेत.ठेकेदाराकडून रस्त्याचे काम दर्जेदार झाले पाहिजे.सध्या खोदलेल्या रस्त्यात पाणी साचले असून प्रचंड चिखल झाला आहे. लवकर रस्त्याचे काम झाले तर नागरिकांची सुटका वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
माऊलीशेठ करंडे - बांधकाम व्यावसायिक, राजगुरूनगर
