Khed Crime | शिरोलीत ४६ वर्षीय महिलेचा क्रूर खून
शिरोली येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घटना घडली
महावार्ता लाईव्ह | शिरोली (शिंदेवस्ती, ता. खेड) येथे अनैतिक संबंधातून एका प्रेमीने ४६ वर्षीय विवाहित महिलेचा धारदार हत्याराने गळा चिरून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १३ नोव्हेंबर) रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार झाला आहे. परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत महिलेचे नाव रूपाली विलास वाडेकर (वय ४६, रा. कल्याण, जि. ठाणे) असे आहे. रूपाली मूळची ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असून, गेल्या काही दिवसांपासून ती खेड तालुक्यातील शिरोली येथे प्रेमीच्या घरी वास्तव्यास होती. आरोपी ललित दिपक खोल्लम (वय ३७, रा. शिंदेवस्ती, शिरोली, ता. खेड) याच्याशी रूपालीचे अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दोघांमध्ये सतत भांडणे होत असल्याने रागाच्या भरात ललितने रूपालीचा गळा चिरून तिचा खून केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटना शिरोली येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली. रात्री सव्वा अकरा वाजता रूपालीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेहाची पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ललित यापूर्वी काही वर्ष एका गुन्ह्यात तुरुंगवास भोगून आला आहे. ठाणे जिल्ह्यात असताना दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. रूपालीचे पती काही वर्षांपूर्वी मयत झाले असल्याने ती नातेवाईकांकडे राहत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती ललितच्या घरी वास्तव्यास होती.
