पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुका भाजपा युवामोर्चा कडून रास्ता रोको
राजगुरूनगर : प्रतिनिधी
राजगुरूनगर जवळच्या चांडोली येथील पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुका भाजपा युवामोर्चा कडून रास्ता रोको आंदोलन करीत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील अल्पसंख्याक विकास व औकाफ कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणातील आरोपींकडून नबाब मलिक यांनी कोट्यावधी रुपयांची जमीन खरेदी केल्याचा आरोप राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.त्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याचा निषेध करण्यासाठी खेड तालुका भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मलिकांना लक्ष केले.नबाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करीत चांडोली येथे पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोखो करण्यात आला. यावेळी मलिकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
रास्तारोको करताना भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,युवामोर्चा तालुकाध्यक्ष काळूराम पिंजन,शहराध्यक्ष बाळासाहेब कहाणे,राजन परदेशी,शाम पुसदकर,अजय जगनाडे,,संदेश जाधव,मयूर होते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मलिक व त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा झालेल्या दोघांचा वाटा असलेली जमीन कवडीमोल भावात खरेदी केली आहे.गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांबरोबर मलिक यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.चांडोली येथील महामार्गावर रास्तारोको केल्याने दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांची धावपळ झाली.
-----------------------------------------------------------------------------
