Khed Education Society 88th AGM | खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची ८८ वी वार्षिक सभा उत्साहात; वेबसाईटचे उद्घाटन, शाळेच्या इमारतीच्या मॉडेलचे अनावरण

अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा उत्साहात संपन्न ; शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत संस्थेच्या आगामी योजनांवर सभेत चर्चा

Khed Education Society 88th AGM | खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची ८८ वी वार्षिक सभा उत्साहात; वेबसाईटचे उद्घाटन, शाळेच्या इमारतीच्या मॉडेलचे अनावरण

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. विषयपत्रिकेवरील सर्व ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केले.

 

सभेच्या प्रारंभी संस्थेचे सभासद व हितचिंतक तसेच संस्थेचे माजी लोकल ऑडिटर यांचे निधन झाल्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कै. अजितदादा पवार तसेच विमान अपघातात निधन झालेल्या व्यक्ती आणि देशासाठी शहीद झालेल्या जवानांनाही यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

संस्थेचे उपाध्यक्ष अजित लुणावत यांनी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकांनी उत्तरे देत सविस्तर चर्चा झाली. यावेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मौजे जैदवाडी येथे प्रस्तावित के. टी. ई. एस. न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीच्या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. या प्रस्तावित प्रकल्पाची सविस्तर माहिती संचालक दत्तात्रय सांडभोर यांनी सभासदांना दिली.

 

सभेदरम्यान अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, शांताराम घुमटकर, प्रमोद गानू, काळुराम पाटोळे आणि दिनेश जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अरुण थिगळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी सातव्यांदा निवड झाल्याबद्दल अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्षपदी आमदार बाबाजीशेठ काळे आणि संचालकपदी निवड झालेल्या बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, प्रमोद गानू व सुशील शिंगवी यांचा सत्कार करण्यात आला.

 

खेड तालुक्याचे आमदार बाबाजीशेठ काळे यांनी सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सभेस संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, संचालक डॉ. प्रदीप शेवाळे, कैलास सांडभोर, हिरामण सातकर, प्रदीप कासवा, अॅड. संदीप भोसले, गणेश घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, रेखाताई क्षोत्रीय, उमाताई सांडभोर, स्वानंद खेडकर, राहुल कुंभार यांच्यासह संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. आभार संस्थेचे संचालक हिरामण सातकर यांनी मानले.