Khed Heavy rain hits | शेलू पुलावरून दुचाकीसह व्यक्ती वाहून गेली; शोधमोहीम सुरू, रस्ता वाहतुकीसाठी बंद

मुसळधार पावसाचा फटका; नाईट शिफ्टवरून घरी परतताना अमोल डांगले पुराच्या पाण्यात बेपत्ता

Khed Heavy rain hits | शेलू पुलावरून दुचाकीसह व्यक्ती वाहून गेली; शोधमोहीम सुरू, रस्ता वाहतुकीसाठी बंद

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत असताना शेलू-कुरकुंडी मार्गावरील स्मशानभूमीजवळील नदीपुलावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेलू येथील स्मशानभूमी जवळून जात असताना ओढ्याच्या पाण्याचा लोंढा दुचाकी वरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या अंगावर आल्याने ती व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कडूस गावातील डांगले शिवार परिसरातील रहिवासी अमोल डांगले हे नाईट शिफ्ट संपवून दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी शेलू पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने त्यांचा तोल जाऊन ते दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले.

 

घटनेनंतर त्यांची दुचाकी पुलाखालील पाण्याच्या मोरीमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र, अमोल डांगले यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नसून ते बेपत्ता आहेत. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथकांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

दरम्यान, पुलावरून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने शेलू-कुरकुंडी नदीपुलावरील रस्ता पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद केला आहे. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळावा तसेच पाण्याखालून जाणाऱ्या पुलांवरून वाहने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अमोल डांगले यांचा शोध लागावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.