वजीर सुळक्यावर तिरंगा फडकावून सावित्रीबाईंना वंदन

वजीर सुळक्यावर तिरंगा फडकावून  सावित्रीबाईंना वंदन

राजगुरूनगर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा २८० फुटी वजीर सुळका टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सर करीत सुळक्यावर तिरंगा फडकावून सावित्रीबाईंना वंदन केले आणि ही साहसी मोहीम सावित्रीच्या लेकींना समर्पित केली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती (दि.३) रोजी संपन्न होत असून त्यांच्या जयंतीनिमित्त गिर्यारोहकांनी वजीर सुळका सर करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात नंडिकेश्वर मंदिर,वांद्रे गाव,जि.ठाणे येथून झाली.घनदाट जंगलातील खड्या चढाईचा मार्ग वजीर सुळक्याच्या पायथ्याशी घेऊन जातो.आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो.

पहिला सोप्पा टप्पा पार केल्यावर क्रॅक (तडा गेलेला भाग) गिर्यारोहकांची परीक्षा घेतो. येथून क्रॅक डाव्या बाजूला ठेऊन उजव्या बाजूला जात पुढील टप्पा पार करावा लागतो. या नंतर चा सुमारे ३० फुटी टप्पा पार करताना कस लागतो.सर्वाधिक कठीण असलेला ओव्हरहँगचा टप्पा खूपच कमी पकड असलेल्या खडकातून चिकाटीने ट्रॅवर्स मारत पार करावा लागतो.शेवटचा २५ फुटी निसरडा खडकाळ मार्ग शिखरावर घेऊन जातो.

९० अंशातील सरळसोट कठीण प्रस्थरोहण मार्ग, ओव्हरहँगचा कठीण टप्पा,निसरड्या पाऊलवाटे शेजारी असणारी खोल दरी,पाण्याची कमतरता असणारा दुर्गम परिसर,घनदाट जंगल,कडाक्याची थंडी अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे,जॅकी साळुंखे, चेतन बोडके,सिद्धार्थ बाविस्कर,राजश्री चौधरी,भारत वडमारे,आकाश देशमुख,लव थोरे,करण करंडे,ओमकार गुर्जर,संकेत जाधव,गणेश मोझे,सिमा घुले, कविता फापाळे,निखिल अंजनवाड,शशांक पगार आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम सुरक्षितपणे फत्ते केली.