भामा आसखेड धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सुरु

आमदार दिलीप मोहितेंनी रब्बी पिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाणी सोडायला लावले ; धरणातून पाणी सोडल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधान

भामा आसखेड धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सुरु

 

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्यातील खेडच्या भामा आसखेड धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडले.धरणाचे सांडव्याद्वारे बाराशे क्युसेकने पाणी विसर्ग भामा नदीपात्रात सुरू करण्यात आला.या आवर्तनाचा फायदा खेड, शिरूर,दौंड,हवेली या चार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना होईल.सोडलेल्या पाण्याने धरणापासून ते दौंड तालुक्यातील आलेगावपागा पर्यंतचे भीमा व भामा नदीवरील एकूण १८ बंधारे भरणार असून या पाण्याचा फायदा रब्बी पिकांसह पिण्याचे पाणी योजनांना होणार आहे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरणातून पाणी सोडण्यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कडक भूमिका घेऊन प्रशासनाला तात्काळ पाणी सोडायला लावले.


कालवा समितीच्या नियोजनातील रब्बी हंगामातील पहिले आवर्तन भामा आसखेड धरणातून सोडल्याने शेतकरी वर्गात समाधान पसरले.तर सोडलेल्या पाण्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांना फायदा होईल.आमदार मोहिते पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच भामा आसखेड धरण उपविभागाचे सहाय्यक अभियंता अश्विन पवार यांनी धरणाचे सांडव्याद्वारे बाराशे क्यूसेकने पाणी सोडले.दौंड तालुक्यातील भीमा नदीवरील शेवटचा आलेगावपागा येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरल्यावर विसर्ग बंद केला जाईल.धरणातून पाणी सोडल्यानंतर धरणाखालील नदीकाठच्या शेतकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना धरण प्रशासनाने केल्या.शेतकऱ्यांच्या पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे शेती पिकांना आणि नदीकाठी असणाऱ्या गावच्या पाणी योजनांना सोडलेल्या रब्बी आवर्तनाचा फायदा होणार आहे.


भामा आसखेड धरण ८.१४ टीएमसी क्षमतेचे असून सध्या धरणात ७.२१ टीएमसी म्हणजेच ९४.१५ टक्के पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याची पातळी ६७०.६६ मीटर असून एकूण पाणीसाठा २१७.९४८ दलघमी आहे.तर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा २०४.४२६ दलघमी आहे.धरणातून सोडलेल्या पाण्याचा फायदा भामा-भीमा नदीवरील शेतकऱ्यांच्या सिंचन योजना व गावच्या पाणी योजनांना होईल.शेवटचा दौंड तालुक्यातील आलेगावपागा बंधारा भरल्यानंतर विसर्ग बंद केला जाईल.अशी माहिती भामा आसखेड धरण करंजविहिरे उपविभागाचे शाखा अभियंता निलेश घारे दिली.

​​​​​​
रब्बी हंगामातील पिकांसाठी धरणातून पाणी सोडावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे केली होती.पाणी सोडण्याचे आश्वासन मोहितेंनी शेतकऱ्यांना दिले.रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकांसाठी तात्काळ भामा आसखेड धरणातून पाणी सोडावे अशी सूचना आमदार मोहिते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश भामा आसखेड धरणाचे अधिकाऱ्यांना केल्याने धरणातून पाणी सोडले.पाणी सोडल्याचे कळताच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.