धक्कादायक! राजगुरूनगरमध्ये मुसळधार पावसाचा फटका; स्वस्तीक विहार सोसायटीतील इमारतीचा पाया खचला, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

सततच्या मुसळधार पावसामुळे इमारतीखालची माती वाहून गेल्याने पाया उघडा; प्रशासनाकडून तातडीने पाहणी व सुरक्षात्मक उपाययोजनांची नागरिकांची मागणी

धक्कादायक! राजगुरूनगरमध्ये मुसळधार पावसाचा फटका; स्वस्तीक विहार सोसायटीतील इमारतीचा पाया खचला, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यात गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता निवासी इमारतींनाही बसू लागला आहे. राजगुरूनगर शहरातील आनंदनगर, राक्षेवाडी येथील स्वस्तीक विहार सोसायटीतील एका इमारतीचा पाया खचल्याची गंभीर घटना समोर आली. पावसाच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे इमारतीखालील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने इमारतीचा काही भाग हवेत लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.


या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीच्या पाया परिसरात मोठा खड्डा पडला असून पावसाचे पाणी वेगाने वाहत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाल्याला मोठा पूर आला. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने इमारतीखालील मातीची धूप होऊन पाया उघडा पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने या इमारतीची तातडीने पाहणी करून रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.


दरम्यान, मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते, पूल, शेती आणि घरांचे नुकसान झाले असून विविध भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत धोकादायक इमारतींच्या परिसरात नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.