Chakan Crime : चाकणमध्ये वृद्धाची फसवणूक; अनोळखी व्यक्तीने १.५० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले
व्हिडिओ कॉलच्या बहाण्याने वृद्धाची फसवणूक; सोन्याची चेन आणि अंगठी घेऊन आरोपी पसार
महावार्ता लाईव्ह | चाकण परिसरात दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने एका वृद्ध व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातोहात घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोविंद धर्मराज दरवेश्वर (वय ७९ रा. संतोषनगर, भाम ता. खेड ) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, (दि.३०) रोजी सकाळी १० ते १०.१५ वाजण्याच्या सुमारास ते पुणे-नाशिक रोडवरील सक्सेस पॉईंट व सूर्या इलेक्ट्रॉनिक्समधील वॉशिंग सेंटरजवळून चाकणच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मोटारसायकलवरून त्यांना अडवले.
अज्ञात व्यक्तीने फिर्यादीला मोटारसायकलवर बसवून पुणे-नाशिक रोडवरील सक्सेस पॉईंट व सूर्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वॉशिंग सेंटरजवळ नेले. तेथे त्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन व उजव्या हातातील बोटातील अंगठी पाहून त्याबाबत विचारणा केली.
त्यानंतर संबंधित अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून दाखवित असल्याचे सांगत, आपल्याकडील सोन्याची चेन व अंगठी करण्याबाबत विश्वास निर्माण केला, या प्रकारे विश्वास संपादन केल्यानंतर त्याने फिर्यादीकडील सोन्याचे दागिने घेऊन दुचाकीवरून अज्ञात चोरट्यांनी पळ काढला.
या घटनेत फिर्यादीचे अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातोहात घेऊन अनोळखी व्यक्तीने फसवणूक केल्याबाबत या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.