Zp election | आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत दीप्ती प्रसाद भोगाडे यांची उमेदवारी जाहीर
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने गुळाणीमध्ये ‘खेळ पैठणीचा’ रंगला
महावार्ता लाईव्ह | गुळाणी (ता. खेड) येथे दिप्ती प्रसाद भोगाडे व भोगाडे मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित ‘खेळ पैठणीचा’ हा पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, आनंदाचे वातावरण आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते. या प्रसंगी खेडचे लोकप्रिय आमदार बाबाजी काळे उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना आमदार बाबाजी काळे यांनी रेटवाडी–वाफगाव जिल्हा परिषद गटासाठी दिप्ती ताई प्रसाद भोगाडे यांची उमेदवारी पुन्हा एकदा अधिकृतपणे जाहीर करत त्यावर शिक्कामोर्तब केले. या घोषणेमुळे उपस्थित महिला, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह संचारला.
आमदार काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “खेळ पैठणीचा सारखे कार्यक्रम हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून महिलांना एकत्र आणणारे, त्यांना आत्मविश्वास देणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम आहेत. दिप्ती भोगाडे यांनी कायम महिलांचे प्रश्न, ग्रामविकास आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. जयसिंग भोगाडे यांनी आज पर्यंत केलेले काम व भोगाडे परिवाराचा सामाजिक वारसा दिप्तीताई कशा प्रकारे पुढे घेऊन जात आहे हे सांगताना आमदार साहेबांनी दिप्तीताई ना एक प्रकारे कौतुकाची थाप दिली आहे अशी चर्चा जनसामान्यात सुरु आहे”
तसेच त्यांनी पुढे नमूद केले की, स्वच्छ प्रतिमा, जनतेशी थेट संवाद आणि विकासाभिमुख कामकाज हीच सौ. दिप्ती भोगाडे यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी काळात रेटवाडी–वाफगाव गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्या सक्षमपणे काम करतील, असा ठाम विश्वास आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केला.
भोगाडे यांनी निवडणून आल्या नंतर त्या कश्या प्रकारे काम करणार व भविष्यात रस्ते वाहतूक व जनसामान्य लोकांचे प्रश्न कसे सोडवणार याबाबत खुलासा केला. ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमातून महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. विजेत्या महिलांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. या माध्यमातून महिलांच्या सहभागातून सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भोगाडे मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्ते, महिला भगिनी आणि ग्रामस्थांनी आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत दिप्ती प्रसाद भोगाडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला.
