आई व बहिणीची छेड काढल्याचा राग ; राजगुरूनगर येथे तरुणाचा डोक्यात दगड घालून खून
राजगुरूनगर : बहिणीची छेड काढतो, आईला अश्लील भाषेत बोलल्याच्या कारणावरून चांडोली ( ता.खेड ) येथे एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. याबाबत राजगुरूनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.
याबाबत राजगुरूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निल अशोक इंगुले (वय २२, रा. मोशी, ता. हवेली) यांचा आठ दिवसांपूर्वी चांडोली येथील फळ उत्पादन रोपवाटिकेत खून झाला होता. गुन्ह्याच्या तपासात कोणताही पुरावा हाती नसल्यामुळे अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. त्या ठिकाणाची पोलिसांनी बारकाईने पाहणी केली. तसेच खून केलेल्या गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी कोणताही पुरावा त्या ठिकाणी मिळून आला नव्हता त्यामुळे खून झालेल्या इसमाचा त्याचे वारसांचा व आरोपींचा शोध घेणे खूप कठीण होते.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस पथके तयार करून गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांनी माहिती काढून धागेदोरे शोधत गुन्ह्यातील आरोपी शुभम अजय कांबळे (वय २४), सिराज अब्दुल सलाम (दोघे रा. भीमनगर लक्ष्मीनगर मोशी, ता. हवेली) व इतर तीन विधीसंघर्षित बालक यांनी बहिणीची छेड काढतो व आईला अश्लील भाषेत बोलला याचा राग मनात धरून स्वप्निल अशोक इंगुले याचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याची कबुली दिली. तपासात कोणताही पुरावा हाती नसताना सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, पोलिस हवालदार पुनाजी जाधव, शंकर भवारी, संतोष मोरे, विजय राहतेकर, प्रवीण गेंगजे, सुनील बांडे, संतोष कंठाळे, योगेश भंडारे, सागर शिंगाडे यांनी गुन्हा उघडकीस आणला.
